लोणी काळभोर : पुण्यात दुचाकी वापरणार्यांची संख्या जास्त आहे. मात्र, वाहन चालवताना स्वतः व मागे बसलेल्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याची शिस्त दिसत नाही. साधारण कुटुंबातील मुले पालकांच्या दुचाकीवर बसून शाळेत जातात. या मुलांच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने अपघात घडल्यास त्यांच्या जीवाला धोका होतो. यामुळे विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोफत हेल्मेट वाटपाचे काम रिच ट्रस्ट करत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी सांगितले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना तब्बल ५३८ मोफत हेल्मेट बुधवारी (ता.१४) वाटप करण्यात आले आहेत. यावेळी ते बोलत होते. रिच ट्रस्ट संस्थापिका नीलिमा पाटील, साधना विद्यालयाचे माजी प्राचार्य विजय शितोळे, माजी प्राचार्य संजीव यादव, कमलेश काळभोर, विशाल वेदपाठक, राजेंद्र हजगुडे, शिक्षिका शर्मिला साळुंखे, कलाशिक्षक पराग होलमुखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रिच ट्रस्ट संस्थापिका नीलिमा पाटील म्हणाल्या की, पुण्यातून या मोहिमेचा श्री गणेशा झाला असून, गरीब व सामान्य घरातील मुलांना त्यांच्या शाळांतून या हेल्मेटचे वितरण केले जात आहे. बारामती दौंड, पुरंदरसह अनेक तालुक्यात मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले आहे. हे हेल्मेट फक्त ज्या पालकांकडे दुचाकी चालविण्याचा परवाना आहे. अशाच पालकांना व त्यांच्या मुलांना हेल्मेट वाटप करण्यात येत आहे.
माजी प्राचार्य विजय शितोळे म्हणाले की, आईबाबांच्या दुचाकीवर पुढे उभे राहून, मागे बसून शाळा गाठणार्या चिमुकल्यांसाठी व पालकांसाठी विशेष खास हेल्मेट तयार केले आहेत. रस्ता सुरक्षेची सामाजिक जबाबदारी ओळखून रिच ट्रस्टकडून पुणे जिल्ह्यात तब्बल १६ हजार हेल्मेटचे मोफत वाटप सुरू आहे.
रिच ट्रस्टच्या उपक्रमाचे होतंय सर्वत्र कौतुक
लोणी काळभोर येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूल या इंगजी माध्यमाच्या शाळेतील १३६ विद्यार्थी व त्यांच्या पालकांना असे एकूण २७२ हेल्मेट देण्यात आले. तसेच पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील १३३ विद्यार्थी व त्यांच्या पालकांना २६६ हेल्मेट देण्यात आले. असे एकूण ५३८ मोफत हेल्मेट रिच ट्रस्टकडून वाटप करण्यात आले. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
जीवितहानी टळण्याची शक्यता: अनेकांना होणार फायदा
लोणी काळभोर येथे ५३८ जणांना हेल्मेट वाटप केल्याने अपघातात होणारी जीवितहानी टळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अनेक दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झाला होता. आता हेल्मेटचे वाटप झाल्याने मोठा फायदा होणार आहे.