फुरसुंगी, ता. 19 : इन्स्टाग्रामचे अकाऊंट हॅक करून मारामारी, धमकी व अश्लील संदेश पाठवून एका महिलेची बदनामी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. या गुन्ह्याचा कौशल्यपुर्वक तपास करून फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला अवघ्या 24 तासाच्या आत अटक केली आहे.
आदित्य पांडुरंग होळकर (वय 23 , रा. ठी. पाटील नगर, होळकरवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेच्या पतीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव कोमल (बदललेले नाव) आहे. कोमल यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट कोणीतरी अज्ञात इसमाने मोबाईल संगणकीय इलेक्ट्रॉनिक माध्यमचा वापर करून पासवर्ड मिळविला. अकऊंट हॅक करून त्यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मारामारीबाबतचे, धमकी दिल्याबाबतचे तसेच अश्लील संदेश असलेले स्क्रीनशॉट बदनामी करण्याच्या उद्देशाने ओळखीच्या व्यक्तींच्या इन्स्टा अकांऊटवरती पाठविले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 356(2) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 66(सी), 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी आदित्य होळकर याचा शोध घेऊन अवघ्या 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत.