ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : मोक्का गुन्ह्यात गेल्या पाच महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने पाठलाग करुन अटक केली आहे. ही कारवाई 18 जुलै रोजी सासवड रोडवरील सोनाई हॉटेल समोर करण्यात आली. ऋषीकेश किसन खोड (वय-२४ रा. पांडवनगर, वडकी ता. हवेली जि, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक गुरुवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना गेली ५ महिन्यापासून फरार असलेला मोक्यातील आरोपी हा सासवड रोडवरील सोनाई हॉटेल समोर येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत युनिट सहाचे अंमलदार समीर पिलाने यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सापळा रचला. मात्र, पोलीस आल्याचे कळताच आरोपीने धूम ठोकली. परंतु, पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली.
दरम्यान, आरोपी विरोधात लोणीकाळभोर पोलीस स्टेशन मध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांसह मोक्काच्या गुन्ह्यात गेली पाच महिन्यांपासून फरार होता. अखेर गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या असून वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांच्या पथकाने केली.