पुणे : पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार थांबण्याचं नाव घेईना. मित्रांचा वाद मिटविण्यातून झालेल्या मारामारीत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला मित्रांनीच संपवलं आहे. ही घटना रविवारी (दि. ०१) रात्रीच्या सुमारास घोटावडे येथील आमलेवाडी (ता. मुळशी) येथे घडली. ओंकार भालचंद्र भिंगारे (वय-25, रा. उरवडे, ता. मुळशी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गणेश भंडलकर व सात साथीदारांनी (सर्व रा. उरवडे) मिळून हा भिंगारे याचा खून केला. उरवडे येथील एका फार्म हाऊसवर त्यांचा मित्र आकाश येणपूरे याच्या वाढदिवसानिमित्त आठरा जुलै रोजी जमले होते. त्यावेळी भंडलकर व अविनाश चव्हाण (चिलापे) यांच्यात वाद झाला. चिलापेला खुनाची धमकी भंडलकरने दिली. यावेळी ओंकार भिंगारे मध्यस्ती करत होता. याचा राग गणेशला आला. त्या सर्वांचा मित्र अविनाश आमले (रा. आमलेवाडी) याला याची माहिती मिळाली. त्याने हा वाद मिटण्यासाठी पुढाकार घेतला.
आमले याने रविवारी घोटावडे येथे सायंकाळी सर्वांनी भेटायचे असं ठरले. त्यावेळी भिंगारे एका मित्राला घेऊन घोटावडेतील हनुमान चौकात आला. तेथे आकाश येणपूरे व अविनाश आमले यांना बोलवले. त्यावेळी ओंकार जाधव, गणेश भंडलकर आले. सर्वजण आमले याच्या आमलेवाडीतील घरी जाऊन चहा पाणी घेत हा वाद मिटवण्याचे ठरविले. लहानपणापासून एकाच गावात व शाळेपासून मैत्री असलेले सर्वजण होते. वाद मिटविण्याच्या चर्चेसाठी घोटावडेवरून मुगावडे मार्गे पौडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळील टेकडीच्या पायथ्याशी सर्वजण बसले होते.
दरम्यान, गणेश भंडलकरने इतर चार पाच जणांना आगोदरच तयारीत बोलवले होते. ते तेथील झुडपाच्या मागे लपले होते. वाद मिटविण्याची चर्चा सुरू झाल्यावर पुन्हा वाद सुरू झाला. त्याचे रुपांतर मारामारीमध्ये झाले. त्यावेळी ओंकार जाधवने लपलेल्या मित्रांना बोलवले. त्यावेळेस ओंकार भिंगारे पळू लागला. त्याचा पाठलाग करून भंडलकरने डोक्यात कोयता घालून त्याला पाडले. तसेच दगडाने ठेचून ओंकार भिंगारेचा निर्घुण खून केला. या घटनेनंतर आठ आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम करत आहे.