युनूस तांबोळी
पुणे : जय श्रीरामच्या जयघोषात अयोध्यानगरीत भगवान श्रीराम मूर्तीचा सोमवारी (ता. २२) प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशभरातील रामभक्त या सोहळ्यात रममाण झाले होते. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील मंदिरांमध्ये भजन, किर्तन व महाआरतीचे आयोजन केले होते. गावागावातील मिरवणुकांमधून श्रीराम, सिता, भरत, लक्ष्मण व हनुमान यांचे जिवंत देखावे सादर करण्यात आले होते.
पणत्यांनी उजळला कवठे येमाई परिसर
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीराम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अभिषेक व आरती करून शोभायात्रा काढण्यात आली. जय श्रीरामच्या जयघोषात निघालेल्या या शोभायात्रेत श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमान यांच्या रूपातील चिमुकले आकर्षणाचे केंद्र ठरले. विधिवत पूजा, आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भजनी मंडळांनी भजन सादर केले. रात्री विद्युत रोषणाईमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच आतषबाजी करण्यात आली होती. गावात घरोघरी पणत्या लावण्यात आल्या होत्या.
टाकळी हाजीत महाप्रसाद
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी अभिषेक व आरती करून मिरवणूक काढण्यात आली. जय श्रीरामच्या जयघोषात निघालेल्या या शोभायात्रेत ग्रामस्थांनी सहभाग घेतला, असे सरपंच अरूणा घोडे यांनी सांगितले. महाप्रसाद व आरतीचे नियोजन करण्यात आले होते.
जांबूतमध्ये पारंपरिक वाद्यांची रंगत
जांबूत (ता. शिरूर) येथे संपूर्ण गावात भगवा ध्वज व पताका लावण्यात आल्या होत्या. विद्युत रोषणाई केल्याने गाव विविध रंगांमध्ये न्हाऊन निघाले होते. शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांनी रंगत आणली. तीन दिवस याठिकाणी किर्तन सेवा आयोजित केली होती. ग्रामस्थांनी यामध्ये विशेष सहभाग घेतला. शोभायात्रेत वेगवेगळ्या रूपात आलेले ग्रामस्थ व चिमुकले या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या मिरवणूकीत श्रीरामाच्या प्रतिमेबरोबरच डोक्यावर कलश धारण केलेल्या महिला, भजन गाणारे वारकरी, जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गावातील सर्वच मंदिरे रांगोळी, फुलांनी व रोषणाईने सुशोभित केली होती.
सविंदणे, मलठण, फाकटे, पिंपरखेड या ठिकाणी नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.