पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून काँग्रेस पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत कसबा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या माजी महापौर कमल व्यवहारे नाराज झाल्या असून त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानं काँग्रेस पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
पुणे शहराच्या पहिल्या महिला महापौर असलेल्या कमल व्यवहारे काँग्रेसमधून बंडखोरी करून कसबा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. स्वराज्य पक्षात प्रवेश करून त्या सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कमल व्यवहारे या स्वराज्य पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना, प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या परिवर्तन महाशक्ती च्या उमेदवार असतील.
कमल व्यवहारे या अनेक वर्षे काँग्रेसच्या पदाधिकारी असून त्या शहराच्या पहिल्या महिला महापौर होत्या. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कसबा विधानसभा मतदार संघातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तसेच २०१९ मध्येही त्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. यावेळीही त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने तिथे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांनाच उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे.
गुरूवारी (दि. 24) सकाळी त्यांनी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्याचवेळी त्या बंडखोरी करणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, एका मराठी वृत्त वाहिनीबरोबर बोलताना त्यांनी शुक्रवारी स्वराज्य पक्षात प्रवेश घेतला असल्याचे सांगितले. सोमवारी (दि. 28) आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितले.