पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बापाचं आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नाही तर घरात कोणाला काहीही सांगायचे नाही. नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सुरु होता.
याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३७ वर्षाच्या वडिलांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील तिच्या वडिलांनी फिर्यादीला हाताने मारहाण करुन जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच घरात कोणालाही काहीही सांगायचे नाही, नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी दिली.
फिर्यादीशी वारंवार शरीरसंबंध ठेवून तिला शारीरीक व मानसिक त्रास दिला. ही बाब मुलीच्या आईला माहिती झाली. त्यानंतर आईने मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.