तळेगाव (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत. आता तळेगाव-चाकण मार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव-चाकण मार्गावर अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली आहे. महिलेला चिरडून वाहन चालक वाहनासह पळून गेला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 9) पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या समोर घडली आहे.
या अपघातातील मृत महिलेचे नाव आशा नंदकुमार शिवले (वय 59) असे आहे. याप्रकरणी मयूर आनंद दाभाडे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर दाभाडे यांची आत्या आशा शिवले या पुणे येथील के ई एम हॉस्पिटल मध्ये काम करत होत्या. मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास त्या कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या. त्यानंतर तळेगाव-चाकण रोडवर संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेसमोर आल्यानंतर चाकणकडून तळेगावकडे आलेल्या भरधाव वाहनाने आशा शिवले यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे आशा शिवले यांच्या अंगावरून वाहन गेल्यामुळे ते चिरडले गेले. त्यानंतर अपघाताची माहिती न देता तसेच उपचारासाठी दाखल न करता वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आशा शिवले यांचा यात मृत्यू झाला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.