सागर जगदाळे
भिगवण : सोलापूर पुणे महामार्गावर पळसदेव गावाच्या हद्दीत अचानक मुंबईकडे महामंडळाची बस घेऊन निघालेल्या चालकाची शुद्ध हरपल्याने ही बस महामार्गावरील लोखंडी पट्ट्यानां धडकल्याची घटना घडली. सुजाण नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्याने स्टेरिंगवर नियंत्रण घेऊन ब्रेक दाबल्याने बस मधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीर डेपोतून मुंबईसाठी एमएच ४२ एयु ८०६५ ही बस सोडण्यात आली होती. यात सुमारे ३५ ते ४० प्रवासी प्रवास करत होते. इंदापूरला थांबून बसने पुन्हा आपला प्रवास सोलापूर पुणे महामार्गावर सुरु केला. यावेळी बस पळसदेव गावाच्या हद्दीत आली असता, रात्री साडे अकराच्या सुमारास बसचे चालक गोविंद सूर्यवंशी यांची अचानक शुद्ध हरपली.
शुद्ध हरपल्याने ते बसच्या स्टेरिंगवरच डोके ठेवतात. त्याचवेळी मात्र त्याचा पाय एक्सलेटरवरून निघाल्याने बसची गती कमी झाली. परंतु गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने ही बस महामार्गावरील लोखंडी पट्ट्यानां जाऊन धडकते.
ही बाब याच गाडीतून प्रवास करणाऱ्या सुधीर मारुती रणे ( रा.करकंब, ता. पंढरपूर) यांच्या लक्षात येते. सुधीर राणे यांनी तातडीने बसच्या स्टेरिंगचा ताबा घेत ब्रेक दाबत बस थांबविली. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून बस बचावली.
गाडीचा वाहक संतोष गायकवाड व सुधीर रणे यांनी चालक गोविंद सूर्यवंशी यांना बसमधून उतरवून बाजूला नेले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. ते शुद्धीवर आले व पुन्हा बेशुद्ध झाले. सुधीर रणे यांनी यापूर्वी बसचालक म्हणून काम केले असल्याने त्यांनी चालक गोविंद सूर्यवंशी यांना बस मध्ये बसवून भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने चालक गोविंद सूर्यवंशी यांचा देखील जीव वाचला.
दरम्यान बसची गती जास्त असती किंवा स्टेरिंगवर लवकर नियंत्रण मिळाले नसते तर बस समोर असलेल्या विजेच्या रोहित्रावर किंवा उजनी धरण्याच्या बॅकवॉटरमध्ये पलटली असती. हिम्मत करणाऱ्या सुधीर रणेचे सर्वच प्रवाशांनी कौतुक केले.