पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा एक धक्कादायक प्रताप समोर आला आहे. येथील डॉक्टरांनी जिवंत नवजात बाळाचा स्मशान दाखला तयार केल्याची बाब समोर आली आहेत. हा सर्व प्रकार २३ जुलै सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. अशा गलथान कारभार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.
नेमकं काय घडलं?
शहरातील वायसीएम रुग्णालयात एका महिलेने नवजात बालकाला जन्म दिला. त्या नवजात बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर काही मिनिटांतच त्याचा स्मशान दाखला तयार करण्यात आला. मात्र, नवजात बाळ हे जिवंत असून आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचं कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. हे जग बघण्याआधीच डॉक्टरांनी त्या नवजात बाळाला मृत घोषित कस काय केलं? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
डॉक्टरांनी कागदपत्रांत काय नमूद केलंय?
२३ जुलै २०२४ रोजी महिलेने ५ वाजून २० मिनिटांनी बाळाला जन्म दिला. ते बाळ मृत जन्माला आल्याचं त्या कागदपत्रांमध्ये नमूद केलं आहे. मग, संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटाला त्या बाळाचा स्मशान दाखला तयार करण्यात आला. ८:५६ ला बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, असं डॉक्टरांनी कागदपत्रांत नमूद केलं आहे.