यवत (पुणे) : मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. सरकार त्यांच्या आमरण उपोषणाची व त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत नसल्याने सरकार बद्दल मराठा समाजामध्ये प्रचंड रोष तयार झालेला आहे. याबाबत सकल मराठा समाज दौंड तालुका यांच्या वतीने तहसीलदार अरुण शेलार यांना निवेदन देण्यात आले.
सरकारने मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची व त्यांनी केलेल्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या असलेल्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये (दि.26) जानेवारी 2024 रोजी सगे सोयरें यांच्या बाबतीत शासनाने काढलेल्या अधिसुचनेचा अध्यादेश तात्काळ काढण्यात यावा, हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट व मुबंई गर्व्हमेंट गॅझेट इ. पुराव्यांच्या आधारे मराठा व कुणबी एकच आहेत, असा आदेश पारीत करण्यात यावा. माजी न्यायमुर्ती शिंदे समितीला आणखी राहिलेल्या दस्तऐवजांच्या आधारे कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात ज्या-ज्या मराठा समाज बांधवांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. ते सर्व गुन्हे विनाअट मागे घेण्यात यावे व तसा आदेश काढण्यात यावा. ज्या 57 लाख कुणबी नोंदी सरकारी दप्तरी सापडलेल्या आहेत. त्यानोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र तात्काळ मिळणेबाबत प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. व मागणी करणाऱ्या समाज बांधवांना तातडीने कुणबी दाखले देण्यासाठी त्वरीत आदेश काढावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी वसंतराव साळुंखे, राजाभाऊ कदम, संजय शिंदे, निरंजन ढमाले, शिवराज शितोळे पाटील, समीर मोहिते, सुरेश तळेकर गुरुजी, चंद्रकांत काळे, प्रशांत ताडगे, नाना कांबळे, गणेश दिवेकर,आबासाहेब शितोळे पाटील, सुनील पासलकर, शिवाजी जाचक, संजय शेळके, अरविंद ताडगे, तैय्यब शेख, प्रदिप शितोळे,मंगेश शितोळे, अशोक गोरे यांसह आदि मराठा बांधव उपस्थित होते.