शिरूर, (पुणे) : कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सरपंच नवले यांच्याविरोधात माजी सरपंच अनिल नवले यांनी दाखल केलेली याचिका फेटाळत त्यांना पात्र ठरविले आहे.
नेमकं प्रकार काय?
निर्मला शुभम नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी फेब्रुवारी २०२१ मध्ये निवड झाली. मात्र, सरकारी गावरान जागेवर अतिक्रमण असल्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी माजी सरपंच अनिल नवले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांनी निर्मला नवले यांना अपात्र केले होते.
त्यानंतर निर्मला नवले यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. त्यानंतर पुणे आयुक्तांनी निर्मला नवले यांना पात्र ठरविले. त्याविरोधातही अनिल नवले यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.
या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देत निर्मला नवले यांना पात्र ठरविले आणि अनिल नवले यांची याचिका फेटाळली आहे. सीनिअर कौन्सिल अनिल साखरे व अॅड. रवींद्र पाचुंदकर यांनी निर्मला नवले यांची बाजू मांडली. या निकालामुळे सरपंच निर्मला नवले यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
याबाबत बोलताना निर्मला नवले म्हणाल्या कि, विजय नेहमी सत्याचाच होतो. या सर्व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा विजय माझ्या एकटीचा नसून कारेगावातील सर्व ग्रामस्थांचा आहे, असं निर्मला नवले म्हणाल्या.