जनार्दन दांडगे
उरुळी कांचन, (पुणे) : प्रतीपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाळिंब (ता. दौंड) कडे जाणाऱ्या उरुळी कांचन ते डाळिंब रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची अक्षरश: “वाट’ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे.
प्रतीपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाळिंब येथे हवेली, दौंड, व पुरंदर तालुक्यातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शानासाठी येत असतात. एकादशी दिवशी तसेच बाराही महिने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून सुरू असते. मात्र या रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून प्रवाशांना कंबरदुखी, स्नायूंचे दुखणे, मणक्याचे विकार होत आहेत. तर, काही रुग्णांचे आजार वाढत आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन बिघडण्याचे, वाहनाचे पार्ट खिळखिळे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
शिक्षण, कामास जाणारे, व्यवसायाच्या निमित्ताने नागरिकांची या रोडने नेहमीच वर्दळ पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नेमका कोणता खड्डा चुकवायचा हेच समजत नाही. दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. म्हणून बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत व या रस्त्याच्या सबंधित येणाऱ्या आधिकारी वर्गाने व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी उरुळी कांचन भाजपाचे शहराध्यक्ष अमित कांचन व सामाजिक कार्यकर्ते अजित कांचन यांनी केले आहे.
दरम्यान, या रस्त्यावर जड वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक सतत जात आहेत. मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्योन रस्ते सतत उखडतात आणि गढ्ढे तयार होतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. ग्रामपंचायत फंडातून २० लाख रुपयांचा निधी टाकला असून पीएमआरडीकडे सदर रस्त्याबाबत कोटेशन तयार करून पाठविले आहे. ररस्त्याची आणखी मंजुरी आलेली नाही. तरी ग्रामपंचायतीकडून पुढील आठ दिवसात रस्त्याचे काम सुरु करणार असून पीएमआरडीकडे टाकलेल्या कोटेशनबाबत उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरु आहे.”
याबाबत बोलताना सामजिक कार्यकर्ते अक्षय कांचन म्हणाले, “प्रशासनाने सदर रस्त्याचे काम सुरु न केल्यास सदर ठिकाणी असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावणार आहोत. तसेच भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहरच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.”