पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला रंग चढला आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, दशक्रिया विधीमध्ये देखील प्रचाराची संधी उमेदवार सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीचे शिरूरचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांनी अशाच एका लग्नात हजेरी लावली. वधू-वरांना आशीर्वाद देताना कोल्हे यांनी प्रचारमय शुभेच्छा दिल्या. घड्याळ आणि तुतारीचा मेळ घालून दिलेल्या राजकीय शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अमोल कोल्हे यांनी नुकतीच दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली. लग्नस्थळी पोहोचण्यास कोल्हे यांना थोडा उशीर झाला. ‘तुम्हाला उशीर का झाला’, असा प्रश्न कोल्हे यांना एकाने विचारलं. या प्रश्नाला कोल्हे यांनी मजेशीर उत्तर दिले. अमोल कोल्हे यांनी लग्नातही प्रचाराची संधी सोडली नाही. कोल्हे म्हणाले की, घड्याळ निघून गेल्याने वेळ जुळत नाहीये. पण वधू-वरांच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी… कोल्हेंनी तुतारी व घड्याळ या निवडणूक चिन्हांचा उल्लेख करत वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.
या आगळ्या-वेगळ्या आशीर्वादाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नीचे आश्वीर्वाद घेतले. या वेळी देखील अमोल कोल्हेंनी मोहिते पाटलांना कोपरखळी मारली. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणजे मला मोहिते पाटलांनीही खासदार होण्यासाठी आशीर्वाद दिला, असे समजतो असे अमोल कोल्हे म्हणाले. कोल्हेंच्या या विधानामुळे लग्नमंडपात हशा पिकला. दिलीप मोहिते पाटलांनाही हसू आवरले नाही.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. मात्र, आम्ही आढळरावांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका मोहिते पाटलांनी घेतली होती. आता या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.