पुणे : पुण्यातील उंड्री परिसरातील मिलेनियम लेबर कॅम्पमध्ये जेवणाची चव बिघडल्यामुळे संतापलेल्या तरुणाने हातोडा मारून आचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. शुभम शास्त्री सरकार (वय-६३, रा. पश्चिम बंगाल) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल नारायण मार्डी (वय-४९, रा. जियापुर, पश्चिम बंगाल) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, उंड्री भागात कंन्स्ट्रक्शन साईटवर लेबर कॅम्प तैनात करण्यात आलं आहे. या कॅम्पमध्ये कमल मार्डी, शुभम सरकार यांच्यासह इतर कामगार राहण्यास आहेत. रविवारी शुभम सरकार यांनी सर्वांसाठी जेवण बनविले होते. कमल नारायण मार्डी जेवत असताना जेवणाची चव त्याला आवडली नाही. त्यामुळे मार्डी आणि सरकार यांच्यामध्ये वादावादी झाली. या वादाचं रूपांतर थेट हाणामारीमध्ये झालं. यावेळी आरोपी मार्डी याने हातोडा उचलून शुभम सरकार यांच्या नाकावर मारून त्याला गंभीर जखमी केले.
दरम्यान, शुभम सरकार यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.