पुणे : एका कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ आपल्या कंपनीच्या कामागारांसोबत स्वतः साईटवर जाऊन काम करतो आणि आपण सगळे समान आहोत हा आदर्श घालून देतो, हे दृश्य तसं दुर्मिळच. पण ‘सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड’चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अमोल शिंगटे यांनी हे प्रत्यक्ष कृतीत उतरवल आहे.
‘हायफाय कल्चर’ असलेल्या कॉर्पोरेट जगतातल्या एका कंपनीचे सीईओ आपल्या कामागारांसोबत जावून प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेण्याचे हे बहुतेक पहिलेच आणि एकमेव उदाहरण असावे.
माणसाने कितीही प्रगती केली किंवा यश संपादन केले, तरी त्याने आपली तत्वे कधीही विसरता कामा नये. तसेच त्याला काही मूलभूत गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. अशी धारणा असलेल्या अमोल शिंगटे हे गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ‘सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट’ ही एक एकात्मिक सुविधा व्यवस्थापन, कर्मचारी पुरवठा, कर्मचारी वाहतूक, कॉर्पोरेट फूड सोल्यूशन्स आणि प्रोडक्शन सपोर्ट सर्विस आदी सेवा पुरवण्यात आघाडीवर असलेली कंपनी आहे.
केवळ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हेच यांचे ध्येय नसून कुशल प्रशिक्षित कामगारांची फळी तयार करणे हा देखील त्यांचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून अमोल शिंगटे यांना कामगारांसोबत भेटण्याची आणि त्यांच्या सोबत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेण्याची इच्छा होती. यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी हाऊस कीपिंग, फॅब्रिकेशन, सेफ्टी आदींच प्रशिक्षण घेतलं. अन् त्यानंतर कामागारांसोबत प्रत्यक्ष काम करण्याचा त्यांनी अनुभव घेतला.
या अनुभवा विषयी बोलताना अमोल शिंगटे म्हणतात, प्रशिक्षण काळात या सर्व कर्मचाऱ्यांनी मला चांगले ट्रेनिंग दिले. सेफ्टी बाबत मला अधिक जागृत केलं. साईटवर काम करताना मला प्रत्यक्ष कामाची माहिती मिळाली. अन् या जोरावर मी त्यांच्या सोबत काम करू शकलो.
यामुळे मला जवळून कामगारांना प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न समजावून घेता आले. जे मी भविष्यात नक्कीच निवारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच यामुळे कामागारांमध्येही माझ्या व कंपनी बाबत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. उत्कर्षाकडे वाटचाल करत असताना कर्मचारी आणि कंपनी यामध्ये ताळमेळ साधून कर्मचाऱ्यांना समानतेची वागणूक देण्याचा हा एक उल्लेखनीय प्रयत्न होता. ज्यामध्ये कर्मचारी हा महत्वाचा घटक आहे याची प्रचीती येते.
दरम्यान, ‘सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड’चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल शिंगटे यांच्या या कार्याची दखल घेवून नुकतेच ‘२२व्या ग्लोबल एडिशन’ या पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘ व्हिजनरी लीडर ऑफ द इयर’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.