पुणे : कामाच्या अति ताणामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंट तरुणी ॲना सेबॅस्टियन पेरियालचा मृत्यू झाला होता. त्या ‘ईवाय’ मधील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘अर्न्स्ट अँड यंग’ या कंपनीत काम करणाऱ्या सीए तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी आता केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ॲना सेबास्टियन पेरायिल असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्या आईने ईवाय इंडियाच्या प्रमुखांना लिहिलेला ई-मेल समाजमाध्यमांत व्हायरल झाला. त्यानंतर हे प्रकरण सर्वासमोर आले आहे. केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जाहीर केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कामाच्या अति ताणामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंट तरुणी ॲना सेबॅस्टियन पेरियालचा मृत्यू झाला होता. ‘अर्न्स्ट अँड यंग’ या कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यातच तिचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाला. ॲना सेबॅस्टियन पेरियालचा मृ्त्यू जुलै महिन्यात झाला होता. पण तिची आई अनिता ऑगस्टियनने कंपनीवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण आता चर्चेत आले आहे. कामाच्या दबावामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी कंपनीवर केला आहे.
आईने आरोप कोणते?
ॲनाच्या आईने ईवाय कंपनीच्या भारतातील प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात अनेक आरोप केले आहेत. ॲनाला कामाचा प्रचंड ताण होता. तिला खूप जास्त काम करावे लागत होते. ती रात्र-रात्र आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी देखील काम करायची. तिला पुरेशी झोप मिळत नव्हती. त्यामुळे तिला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ६ जुलै रोजी पुण्यातील दीक्षांत समारंभामध्ये ॲनाच्या छातीत दुखू लागले होते त्यानंतर तिला डॉक्टरकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी कमी झोप आणि कमी जेवणामुळे तिला त्रास झाल्याचे सांगितले होते. २० जुलैला ॲनाचा मृत्यू झाला. ती २६ वर्षांची होती. तिच्या मृत्यूनंतर कंपनीचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी तिच्या अंत्यविधीला सुद्धा आला नव्हता.
ॲना सेबॅस्टियन पेरियाल केरळच्या कोची येथील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये ती सीएची परीक्षा पास झाली. ॲनाला मार्च २०२४ मध्ये ENY या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. ॲना सेबॅस्टियन पेरियालने सेक्रेड हार्ट कॉलेज थेवरा येथून बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनान्स अँड टॅक्सेशनचा अभ्यास केला. बीकॉम पूर्ण केल्यानंतर तिने सीएची तयारी सुरू केली आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये ॲनाने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ॲना खूपच हुशार मुलगी होती. ती विवाहित होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.