पुणे : भेकराईनगर बस डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ ‘गाडी बाजूला घे’ असे सांगितल्याचा राग आल्याने ‘पीएमपीएमएल’ बस चालकाने आपल्या सहकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करीत चक्क त्याच्या कानाची पाळीच तोडल्याने खळबळ उडाली आहे. सहकाऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बस चालकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेकराईनगर बस डेपोमध्ये बुधवारी (ता. २०) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कोरे या बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रदीप आण्णासाहेब सुतार (वय ४१, रा. काळेवाडी, पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरे आणि फिर्यादी सुतार हे दोघेही भेकराईनगर बस डेपोमध्ये काम करतात. बुधवारी संध्याकाळी फिर्यादी सुतार हे त्यांच्या चारचाकी गाडीमधून जात होते. त्यावेळी आरोपीची गाडी मध्येच उभी होती. दरम्यान, फिर्यादींनी त्याला ‘गाडी बाजूला घे’ असे सांगितले. याचा चालक कोरे याला राग आल्याने त्याने शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्यांनी सुतार याच्या कानाचा लचका तोडत कानाची पाळीच तोडली. याबाबतची फिर्याद देण्यात आली आहे.