पुणे: दौंड, हवेली तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीचे पात्र आज दुथडी भरून वाहू लागले आहे. मुळा – मुठा या नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने योगीराज संतराज महाराज तिर्थाशेत्र व वाळकी, रांजणगाव, आलेगाव, पिराची वाडी अशा गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या संपर्क तुटला असून गुरुवारी दि. २0 रोजी पुलावर पाणी आले.गेल्या दोन दिवसापासून दौंड, मावळ, खेड, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्याने ता.19 गुरुवार रोजी खडकवासला धरणातून 8734 क्युसेस विसर्ग वाढवून रात्री साडे नऊ वाजता 1500 क्यूसेस ने विसर्ग सोडण्यात आला असल्याने मुळा – मुठा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीच्या दोन्ही बाजूने शेत जमीन पाण्याखाली गेली आहे.

अनेक नदीकाठच्या गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल वाहतूक विभाग यांच्या वतीने मुळा मुठा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता बंद करून वाहतूक देलवडी – राहु तसेच पारगाव या बाजूने फिरवली असल्याची माहिती तलाठी दिपक अजबे व त्याचे सहकारी रत्नाकर गायकवाड यांनी दिली. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुळा- मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आणि पुलावरून पाणी गेल्याने बघ्यांची मोठी गर्दी परिसरात झाली होती.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा
खडकवासला धरणामधून मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये टप्या टप्प्याने वाढ करण्याची शक्यता आहे. तरी नदी परिसरातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर सोडू नये व कोणालाही नदीपात्रात उतरू न देण्याची खबरदारी घ्यावी. विसर्गात आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घेण्यात यावी असे अवाहन करण्यात आले आहे.

चार दिवसापासून सलग पाऊस पडत आहे आणि पुढील 24 तासात हवामान खात्याने जोरदार वृष्टी होण्याचे संकेत दिलेले आहेत. तसेच खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या सर्व गोष्टी पाहता दोन्ही बाजूच्या नदीचा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी घाई गडबडीमध्ये कोणीही मोटर काढण्यासाठी नदीला जाऊ नये. पावसाळ्याच्या दिवसात नदीचा संपूर्ण वीजपुरवठा बंद केलेला आहे. काही ठिकाणच्या फिडरवर गावांचा वीज पुरवठा असल्यामुळे नदीचा काठ बंद करता आलेला नाही त्यामुळे कुणीही नदीकाठी मोटर काढण्यासाठी जाऊ नये. त्याचप्रमाणे जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत आपल्या शेतातील मोटर चालू बंद करताना व्यवस्थित ती खबरदारी घ्यावी. सततच्या पावसाने बऱ्याच वेळा वीज प्रवाह खोक्यामध्ये उतरलेला असतो. पावसाळ्याच्या दिवसात घरातील उपकरणे हाताळताना आवश्यक ती काळजी घ्यावी ओल्या हाताने शक्यतो वीज उपकरणे हाताळू नये.
सागर कटके – उपकार्यकारी अभियंता महावितरण (केडगाव)







