यवत : चौफुला येथील प्रियांका लॉजमध्ये केरळ येथील व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील चौफुला येथील प्रियांका लॉजमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह खोलीत आढळून आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मनोज. पी.के. कोचू कुंजू (वय-41, पुथेन वीडू वडाक्कथील, केरळ) असे मृताचे नाव आहे.
मनोज पी. के. कोचू कुंजू हा चौफुला गावच्या हद्दीतील प्रियांका लॉजमधील रुम क्रमांक 3 मध्ये दोन दिवस राहण्यासाठी आला होता. शनिवारी सकाळी मनोज बाहेर न आल्याने लॉज मालकाने खोलीचा दरवाजा ठोठावला. बराच वेळ ठोठावूनही दरवाजा न उघडल्याने लॉज मालकाने इतरांच्या मदतीने दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला असता मनोज हा बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला. त्यावेळी त्यास उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान मनोजला मृत घोषित केले.
मनोजने आत्महत्या केली की अन्य काही कारणाने त्याचा मृत्यू झाला याची माहिती मिळू शकली नाही. याबाबत पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.