लोणी काळभोर : कामावर जातो असे सांगुन गेलेल्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कामगाराचा सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका गोडाऊनच्या पार्कीगमधील कारच्या कॅबिनमध्ये मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह उरुळी कांचन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अशोक पुरुभाजे इंगोले (वय ५०, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इंगोले यांचे दाजी महादेव गोविंद कांबळे (वय-४८, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव कांबळे यांचा भाजी विक्रीचा धंदा आहे. तर कांबळे यांचे अशोक इंगोले हे नात्याने दाजी आहेत. दोघेही लोणी काळभोर येथील पाषाणकर बाग परिसरात कुटुंबासोबत राहतात. अशोक इंगोले हे सोमवारी (ता. ७) सकाळी कामावर जातो, असे सांगुन गेले ते परत घरी आलेच नाहीत. त्यानंतर फिर्यादी महादेव कांबळे यांच्या बहिणीने पती अशोक इंगोले यांना वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवानंद भैरवनाथ या कामगाराने फिर्यादी महादेव कांबळे यांना फोन करून सांगितले की, तुमचे दाजी अशोक इंगोले हे आर. आर. किराड यांच्या गोडाऊनमधील पार्कीगमध्ये असलेल्या एका कारच्या कॅबिनमध्ये मयत आवस्थेत मिळून आले आहेत. त्यानंतर फिर्यादी महादेव कांबळे यांनी त्वरित सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, अशोक इंगोले हे मयत आवस्थेत आढळून आले.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश जाधव करीत आहेत.