बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुतण्या युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांची साथ सोडली. त्यानंतर सख्खा भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला पवार यांनीदेखील अजित पवारांची साथ सोडल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. कुटुंबाने साथ सोडणे हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात होते. या पार्श्वभूमीवर आता सोशल मिडीयावर व्हायरल होणारा एक फोटो चर्चेचा विषय बनत आहे. या फोटोमध्ये पवार कुटुंबियातील सुप्रिया सुळे यांच्यासह राजेंद्र पवार, सुनंदा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, रोहित पवार व युगेंद्र पवार हे एकत्र दिसत दिसत आहेत. “वटवृक्ष पालवी फोडत असतो, कोणाच्या जाण्याने कोणाचे काही अडत नसते” असा मजकूर या फोटोवर टाकून तो फोटो व्हायरल केला जात आहे.
युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांची साथ यापूर्वीच सोडली होती. आता बंधू श्रीनिवास पवार यांनी रविवारी (ता. १७) अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली. काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. श्रीनिवास पवार म्हणाले की, मी दादांच्या विरोधात गेल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटते. कारण आजपर्यंत मी दादाला नेहमीच साथ देत आहे. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मी मारली. आमदारकीला दादा आहे, तर खासदारकी साहेबांनाच दिली पाहिजे, या मताचा मी आहे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. त्यांना आदर दिला पाहिजे. वडिलधाऱ्यांचा आदर करणे, ही आपली संस्कृती आहे. असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीतील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यातच आपण कुटुंबात एकटे पडणार असल्याचे नमूद केले होते, त्या वेळेस अजित पवार हेच भावनिक आवाहन करत असल्याची चर्चा झाली होती, आता मात्र प्रत्यक्षात सगळे कुटुंबिय एका बाजूला तर अजित पवार यांचे कुटुंब दुसऱ्या बाजूला असे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बारामती मतदारसंघात एकाच कुटुंबातील आजोबा आजींचा विचार वेगळा तर आई वडीलांचा वेगळा, नवमतदारांची भावना तिसरीच आहे तर महिलांचा विचारही काहीसा वेगळा असे चित्र आहे. कुटुंबातही शरद पवार बरोबर की अजित पवारांची भूमिका योग्य या वरुन दररोज वादविवाद होताना पाहायला मिळत आहेत.