पुणे : रेल्वे बोर्डाने दौंड-अंकाईपर्यंतचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिणामी सध्या सोलापूर विभागात असलेला सुमारे २२४ किलोमीटरचा मार्ग आणि त्यावरील २४ स्थानके पुणे विभागात समाविष्ट होणार आहेत. यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाचे क्षेत्रफळ वाढणार आहे. २०२१ साली हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. अखेर बुधवारी (ता. २१) या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
याआधी पुणे विभागाचे कार्यक्षेत्र सोलापूरपेक्षा कमी होते. या विभागांच्या कार्यक्षेत्रात संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सोलापूर विभागाचे क्षेत्र घटणार आहे. यामुळे गाड्यांचे परिचालन अधिक परिणामकारक होईल.
प्रवाशांना ‘हे’ लाभ होणार…
* नव्या गाड्यांमुळे पुण्याशी दोन शहरांची कनेक्टिव्हिटी वाढणार.
* शिर्डी, नगर या शहरांतील नागरिकांना पुण्याला येणे सोईचे.
* अहमदनगर, शिर्डी स्थानके विभागात आल्याने दोन शहरांसाठी पुण्याहून डेमूसारखी सेवा सुरू करणे शक्य.
* अपघात झाल्यास अथवा आणीबाणीच्या स्थितीत सोलापूरच्या तुलनेत पुण्याहून लवकर मदत शक्य.
मालगाड्यांचा प्रवास विनाविलंब
दौंड कॉर्ड लाइन ते मनमाड सेक्शन हा भाग सोलापूर विभागात येतो. त्यामुळे सोलापूर विभागाचे चालक ह्या मार्गात रेल्वे चालवितात. यात प्रवासीगाड्यांना काही अडचण नाही, मात्र मालगाड्या पुण्याहून मनमाडकडे निघाल्यावर काष्टी आणि पाटस अशा छोट्या स्थानकांवर चालकांसाठी दोन ते तीन तास थांबविल्या जातात. हा भाग पुणे विभागात समाविष्ट झाल्यानंतर असा विलंब टळेल.
या निर्णयाविषयी बोलताना पुण्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंह म्हमाले की, गेल्या काही वर्षांपासून हा प्रस्ताव विचाराधीन होता. त्याला अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. एक एप्रिल पासून हा मार्ग पुणे विभागाला जोडला जाईल. यामुळे पुणे विभागाचे उत्पन्न वाढणार आहे.