येळकोटssयेळकोट जय मल्हारचा गजर… अन् भंडाऱ्याची उधळण; देलवडीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
गणेश सुळ
केडगाव : वाघ्या मुरळीचा संबळावरचा निनाद… येळकोटsss येळकोट जय मल्हारचा गजर… भंडाऱ्याची उधळण करत चंपाषष्ठी उत्सवानिमित्त देलवडी (ता. दौंड) येथील प्रती जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावत, विविध भक्तीमय कार्यक्रम सादर करून सोहळ्याची रंगत वाढवली.
दौंड तालुक्यातील देलवडी येथील प्रती खंडेराया मंदिरात चंपाषष्ठी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गशीर्ष प्रतिपदेला गावकऱ्यांच्या हस्ते घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ झाला होता. उत्सव काळात वाघ्या मुरुळी, लोक कलावंतांचा जागर, मल्हारी सहस्रनाम याग, होम हवन, देवदिवाळी, देवाला तेलवण करून हळद लावण्यात आली. सोमवारी पहाटे चंपाषष्ठी उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त देवाचे घट उठविण्यात आले. मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने देवाला दुग्धाभिषेक महापूजा घालण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने गेली तीन दिवस हजारोंच्या संख्येने भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेऊन कुलधर्म-कुलाचार केले. चंपाषष्ठी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हजारो भाविकांनी श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी प्रती जेजुरी मानल्या जाणाऱ्या देलवडी येथील गडावर गर्दी केली होती.
देलवडी व एकेरीवाडी (ता. दौंड) येथील प्रती जेजुरी खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्त सोमवारी (ता. १८) पहाटे खंडोबा देवाचा अभिषेक, मानाचे दंडवट तर दुपारी एक वाजता एकेरीवाडी ग्रामस्थांचा मानाचा पोशाख, नंतर देलवडी ग्रामस्थांचा मानाचा पोशाख देवाला परिधान करण्यात आला. सोमवारी रात्री देवाचा छबिना, त्यानंतर शोभेच्या दारुची आतषबाजी झाली. रात्री देलवडी येथे पांडुरंग मुळे मंजारवाडीकरसह तुकाराम खेडेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. एकेरीवाडी येथे मालती इनामदार लोकनाट्य तमाशा कार्यक्रम झाला. मंगळवारी (ता. १९) सकाळी तमाशा हजेरी, दुपारी ३ वाजता देलवडी येथे चितपट कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेवटची कुस्ती वैभव झांजे व संभाजी साळुंखे यांच्यामध्ये ५१ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. वैभव झांजे हा या चितपट कुस्तीचा मानकरी ठरला. त्याला चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. रात्री चावडीवर बलुतेदारांना मानाचा विडा वाटण्यात आला. त्यानतंर मालती इनामदार लोकनाट्य तमाशाने यात्रेची सांगता झाली.