खडकवासला : सांबरेवाडी येथे शनिवारी ता.१४ रोजी मध्यरात्री दोन गटात गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये सोमनाथ अनंता वाघ (वय २४, रा. खानापूर, ता. हवेली) हा जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन्न वांगडे हवेली पोलीस स्टेशन यांनी याबाबद्दल माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघ याच्या मृत्यूनंतर खानापूर गावात आणि परिसरात पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी सोमनाथ याच्यावर चेतन ऊर्फ दाद्या जावळकर याने दोन गोळ्या झाडल्या, त्या गोळ्या सोमनाथ याच्या छातीत घुसल्या होत्या. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्याच मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी हवेली पोलीसांनी चेतन ऊर्फ दादया जावळकर, यश ऊर्फ माम्या जावळकर, प्रवीण सांबरे यांना अटक केली असल्याची माहिती दिली. हवेली पोलिस ठाण्यातील घेरा सिंहगड गावाच्या हद्दीत दोन गटात शनिवारी हा प्रकार झाला होता. यामध्ये यापूर्वी रोहित ऊर्फ भोऱ्या ढिले व तेजस वाघ (दोघे ही रा. खानापूर, ता. हवेली) यांच्यात पूर्वीच्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून ही घटना घडली होती. या घटनेमध्ये रोहित ऊर्फ भोऱ्या ढिले यास लोखंडी रॉड, कोयता या घातक हत्याराने अंगावर वार केले होते. यात रोहित याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिल्याने दोन्ही गटाच्या विरोधात हवेली पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तसेच यातील सहभागी तरुणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.