राजेंद्रकुमार शेळके
जुन्नर : जुन्नर तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ‘सिटू’च्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन केले. यानंतर अनेक महिलांनी जोरदार घोषणा देत, गाणी गात सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
आंदोलनकर्त्या महिलांना किसान सभेच्या वतीने गणपत घोडे तसेच एस.टी.आय. विद्यार्थी संघटनेचे राजेंद्र शेळके यांनी मार्गदर्शन केले. सल्लागार लक्ष्मण जोशी, शुभांगी शेटे यांनी सरकारच्या नाकर्तेपणाच्या धोरणावर सडकून टीका केली. महिला बाल विकास विभागाने अनेक सेविका, मदतनीस यांना कामावरून काढून टाकण्यासाठी नोटीस दिल्या आहेत. या नोटीशीला महिलांनी उत्तरे दिली.
सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या, अंगणवाडी सेविका, मदतनीसांना अनुक्रमे २६,०००, १८००० हजार रुपये वेतन द्या, अंगणवाडीचा पोषण आहार दर्जेदार द्या, अमृता आहार दर्जेदार मिळाला पाहिजे, आदी ११ मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
या वेळी सचिव मनीषा भोर, सुशीला तांबे, रुक्मिणी लांडे, जयश्री भागवत, तुळाबाई घोडे, सीमा कुटे, गीता शेटे, मीना मस्करे, सविता ताजने, मीरा आरोटे, साधना मोजाड आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.