पुणे : येरवडा परिसरात धारदार शस्त्रे हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. भारतनगर परिसरात बुधवार (दि. १९) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आठ ते नऊ जणांच्या टोळक्यांनी हातात कोयता, कुऱ्हाड अशी धारदार हत्यारे हातात घेऊन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी आरोपींनी राहुल छजलानी यांच्या बंद चहाच्या दुकानावर हल्ला केला होता. तसेच कैलास कुसाळकर यांच्यावर देखील धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, टोळक्यांनी हवेत कोयते फिरवून परिसरात दहशत पसरविल्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये दहशत पसरून नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले होते. तसेच व्यावसायिकांनी तत्काळ दुकाने बंद करत घटनास्थळापासून पळ काढला होता. याप्रकरणी छजलानी कुटुंबीयांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने सर्व हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढील तपास पूर्व प्रादेशिक विभागाचे पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.