सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील अकोले गावात निरमा पावडर विकण्याच्या बहाण्याने आलेल्या ३० ते ३५ वर्षीय वयोगटातील दोन तरुणांनी जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील अंदाजे १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने हिसकावून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सुलोचना विकास दराडे (वय २२, गृहिणी, रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २९) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अकोले येथे फिर्यादीच्या घराबाहेर ३० ते ३५ वर्षीय वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी फिर्यादी सुलोचना दराडे यांना
‘तुम्हाला निरमा पावडर घ्यायची का?’ अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी यांनी ‘निरमा पावडर नको’ असल्याचे सांगितले.
दरम्यान, पाळत ठेवत आरोपींनी त्याचवेळेस महिलेकडे पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी केली. फिर्यादी पाणी आणण्यासाठी आत जात असतानाच त्यातील काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीने दमदाटी करून फिर्यादीचे डाव्या कानातील सोन्याचे कानातले व त्यावरील सोन्याचे वेल व आकाशी रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने फिर्यादी समोर येऊन त्यांचे गळ्यातील मणी मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले. जबरी चोरी व दमदाटी करून, फिर्यादीला घरामध्ये कोंडून अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दागिने हिसकावून पळून गेले.
या प्रकरणाचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत. या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे. निरमा पावडर अथवा अन्य कोणतीही वस्तू विकणारे पाणी मागण्याच्या निमित्ताने घरात घुसून चोऱ्या, दरोडा करून पळून जात आहेत. यामुळे महिलांनी बेसावध राहू नये. अनोळखी संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित भिगवण पोलीस स्टेशनशी ९५५२१६४१०० या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.