पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा भागात आरोपींनी दारूच्या नशेत ८ गाड्यांची तोडफोड केली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी पसार झाले. मात्र, मोठ्या शिताफीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन, अटक केली आहे.
येरवडा आणि मुंढवा परिसरात वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. तोडफोड करत परिसरात दहशत माजवल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या भुरट्यांकडून नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जातात. त्यासोबतच गाड्यांचे नुकसान देखील होत आहे. कालच पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. येरवडा पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली होती. अजय चित्रगुप्त बागरी, सुमीत भारत सितापराव असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे होती.
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी कंबर कसली आहे. अट्टल गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर अशा लहान-मोठ्या टोळ्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यांना आधीच आदेश काढून कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी दिली आहे. कोयता गॅंग तसेच तोडफोड करणाऱ्या टोळीची ज्या परिसरात दहशत माजवली त्याच परिसरात धींड काढली होती. तरीही हे प्रकार वाढतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. याचा गुन्हेगारांवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.