पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापुर हद्दीतील बोगद्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. कंटेनर, गॅस टँकर आणि कार अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ७ वाजण्याच्या सुमारास खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला.
अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून एकजण जागीच मृत्यू झाला आहे, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. अक्षय वेंकटराव ढेले (वय-३० रा. अहमदपूर, जि.लातूर) असे मृत चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, खालापुर हद्दीतील बोगद्याजवळ कंटेनर, गॅस टँकर आणि कार अशी तीन वाहने एकमेकांवर जोरदार आदळली. या अपघात वाहनांचा चक्काचूर झाला असून गॅस टँकर वरील चालक अक्षय ढेले हा गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कार वाहतूक कंटेनरवरील चालक पळून गेला आहे.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी या अपघातात मदत कार्य केले. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फरार कंटेनरचालकचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.