पुणे: पुणे शहरातील रस्त्यांची आणि पदपथांची यांत्रिक पद्धतीने नियमित स्वच्छता करण्यासाठी घनकचरा विभागाने १६० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. यामध्ये चारही झोनमधील सुमारे ४० कि.मी.चे रस्ते आणि पदपथ स्वच्छ केले जाणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी या कामासाठी काढलेल्या निविदा ३५ टक्के अधिक दराने आल्याने त्या रद्द करण्यात आल्या होत्या. रुंदीने मोठ्या असलेल्या रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यात येते. महापालिकेच्या पाचही झोनमधील रस्त्यांच्या सफाईच्या कामांसाठी पूर्वी दोन निविदा काढल्या होत्या. त्यापैकी एका ठेकेदाराकडे एका झोनचे काम होते, तर उर्वरित चार झोनचे काम दुसऱ्या ठेकेदाराकडे होते. चार झोनचे काम असलेला ठेकेदार बँकरप्ट झाल्याने फेब्रुवारीपासून त्यांचे काम बंद झाले आहे.
त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून चार झोनमधील रस्त्यांवर कर्मचाऱ्याचे साम्राज्य दिसून येते. काही महिन्यांपूर्वी प्रचलित दराने चार झोनसाठी निविदा प्रक्रिया राबविली. फक्त रस्ते सफाईच्या जेटिंग मशीनने डिव्हायडर आणि पदपथही स्वच्छ करण्याचा यामध्ये समावेश करत प्रति किलोमीटरसाठी १ हजार २३ रुपये खर्चाचे एस्टीमेट करून निविदा मागविल्या. या निविदा ३५ टक्के अधिक दराने आल्या. त्यामुळे प्रशासनाने निविदा रद्द करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुन्हा रिइस्टीमेट करण्यात आले. नव्या एस्टिमेटनुसार प्रति कि.मी. साठी १ हजार ३३९ रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच पुढील प्रत्येकवर्षी सहा टक्के दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सात वर्षांमध्ये हा खर्च साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत होणार आहे.
चार झोनमधील साधारण १० कि.मी.च्या रस्त्यांची नियमित स्वच्छता होणार आहे. प्रशासनाने पहिल्या निविदेत महापालिकेने दिलेला पूर्वीचाच दर दिला होता. परंतु नवीन निविदेत पिंपरी चिंचवड, नवी मुंबई आणि बृहन्मुंबईमध्ये सुरू असलेल्या मॅकॅनिकल स्विपिंगच्या कामाशी तौलानिक अभ्यास, तसेच रोजंदारीच्या दरातील वाढ गृहीत धरून एस्टीमेट केल्याने दर ३१६ रुपयांनी वाढला आहे.
या कामा अंतर्गत सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, विमानतळ रस्ता, मगरपट्टा येथील रस्त्यांसारख्या मोठ्या रस्त्यांची व पदपथांची नियमित सफाई केली जाणार आहे