हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात किरकोळ वादातून टोळक्याने दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 7 ते 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 24) दुपारी हि घटना घडली आहे.
चैतन्य सूर्यवंशी, आदित्य मोहोळकर व इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमोल बाळासाहेब लोंढे (वय 19, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर) याने याबाबत हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने अमोल आणि त्याचा मित्र उमेश ससाणे यांनी काळेपडळ परिसरात टँकर मागविला होता. टँकरमधून पाणीवाटप सुरू असताना आरोपी सूर्यवंशी आणि मोहोळकर यांना धक्का लागला यावेळी चौघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सूर्यवंशी आणि मोहोळकर साथीदारांसह काळेपडळ परिसरात दुपारी आले. त्यांनी शिवीगाळ करून रस्त्याकडेला लावलेल्या रिक्षा, मोटारी, टेम्पोच्या काचा दांडक्याने फोडल्या.
दरम्यान, दांडके उगारून परिसरात दहशत माजविली. काळेपडळ ते प्रगती मैदान परिसरातील नऊ ते दहा वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.