पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका फिरस्त्या श्वान मादीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. प्रकरणी एका व्यक्तीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा किळसवाणा प्रकार १६ जुलै रोजी वाकड येथील एका निर्माणाधिन बांधकाम प्रकल्पावर घडला आहे.
याप्रकरणी सुरक्षा रक्षक लवलेश रामप्रसाद तिवारी (वय-२९, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चिरंजीत निशिकांत बिस्वास (वय-३०, रा. उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरंजीत याने बांधकाम प्रकल्पावर आठ ते दहा महिने वयाच्या श्वान मादी पिल्लाला आणले आहे. त्याने त्या पिल्लाला इमारतीच्या तळमजल्यावर नेले. आणि तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात अधिक तपास करीत आहेत.