पुणे : पुणे-सोलापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावरील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात आले आहेत. पुणे- सोलापूर रस्त्यावर मम्मादेवी चौक ते अर्जुन रोड टी जंक्शनदरम्यान एम. पी. पेट्रोलपंपाजवळ पिण्याची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.
या कामाची सुरुवात शुक्रवारी (दि. ६) रात्री ८ वाजल्यापासून होणार असून, हे कामकाज दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा पुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर व दुसऱ्या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
असा आहे वाहतूक बदल
- सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी वाहतूक सरळ अर्जुन रोड मम्मादेवीमार्गे स्वारगेटकडे जाईल, यात कोणताही बदल नाही.
- स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौकात सरळ जाण्यास बंदी असून, डावीकडे वळून बिशप सर्कल उजवीकडे वळून सोलापूर रोडला जातील. सदर मार्ग हा वन वे करण्यात येत आहे.
- सोलापूरवरून येणाऱ्या वाहनांना बंदी असून, सदर वाहने ही सरळ मम्मादेवी गोळीबार चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
- डॉ. कोयाजी रोडने येणारी वाहने हरप्रीत मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक पुलगेट बस डेपोमार्गे कोंढव्याला जातील.
- सोलापूरकडून येणारी वाहने मम्मादेवी चौकात उजवीकडे वळण्यास बंदी असून, ती गोळीबार चौक सरळ व उजवीकडे वळून कॅम्पमार्गे इच्छितस्थळी जातील.