पुणे : पुण्यात वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याची घटन घडली आहे. या अपघातात २० वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना कोंढवा-कात्रज रस्त्यावरील शिवशंभोनगरमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चाेपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रयागबाई नारायण बोखारे (वय-७२, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्या वारकऱ्यांना घेऊन टेम्पो रविवारी (३० जून) रात्री मुक्कामी निघाला होता. कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक एक येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. आणि टेम्पो उलटून टेम्पोतील २० वारकऱ्यांना दुखापत झाली.
या अपघातात प्रयागबाई बोखारे यांच्या डोके, हाताला दुखापत झाली असून मनगट फ्रॅक्चर झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.