बिबवेवाडी,(पुणे) : पुण्यात भरधाव टेम्पोच्या धडकेत सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात टेम्पोने पादचारी दाम्पत्याला धडक दिली. ही घटना बिबवेवाडी परिसरातील डाॅल्फिन चौकात घडली. या अपघातात सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. रुद्र सचिन शिंदे (वय-६) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याच नाव आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी सचिन शिंदे ( ३२, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात शिंदे यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिंदे दाम्पत्य रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील बिबवेवाडी भागातील डाॅल्फिन चौकातून अप्पर इंदिरानगरच्या दिशेने निघाले होते. यावेळी शिंदे यांच्यासोबत सहा वर्षांचा मुलगा रुद्र देखील होता. भरधाव वेगात आलेल्या टेम्पाेने पाठीमागून शिंदे कुटुंबाला धडक दिली. या अपघातात शिंदे यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा मुलगा रुद्र टेम्पोच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.