पुणे : शहरात दुपारच्या तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा तीव्र चटका बसत आहे. रविवारी (दि. २७) शहरात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. तर वडगावशेरी येथील तापमान ३६ अंश सेल्सिअसवर गेले आहे. दरम्यान, शहरात थंडीची चाहूल कायम असून, सकाळी धुके पडत आहे. शहरातील वातावरण निरभ्र झाले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने दुपारच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. रविवारी तापमानात वाढ झाल्याने दुपारी नागरिक घामाघूम झाले होते.
शनिवारी कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअस इतके होते. त्यात रविवारी वाढ झाली. पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. शहरात थंड वारे वाहत असल्याने पहाटे गारठा पडत आहे. रविवारी शिवाजीनगरमध्ये १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.