लोणी काळभोर: जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हे कोरेगावमूळ (ता. हवेली) येथील शेतकरी सुधीर शितोळे यांचे चिरंजीव तेजस शितोळे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. तेजसने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी-२ पदावर गगनभरारी घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०२३ साली जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी २ ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आयोगाच्या वतीने सोमवारी (ता.१ एप्रिल) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत तेजस शितोळे याने ४५ वे स्थान प्राप्त करून गरुडझेप घेतली आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले-मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु, तेजस शितोळे याने कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला. पहिले तीन वेळा अपयश आले, मात्र चौथ्या प्रयत्नात यश मिळविले. त्याच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
तेजसचे वडील सुधीर शितोळे यांची कोरेगाव मूळ परिसरात शेती आहे. शेतीवर शितोळे कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकला जातो. तेजसच्या आई सोनाली या गृहिणी आहेत. तर छोटी बहिण आर्या ही विद्यकीय शिक्षण घेत आहे. तेजसने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधून घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण डेक्कन येथील लक्ष्मणराव आपटे कॉलेजमधून विज्ञान शाखेतून पूर्ण केले.
तेजसने सन २०१९ मध्ये पुण्यातून स्थापत्य अभियंता पदवी प्राप्त केली. पुढे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे येथून एम टेक ही उच्च पदवी प्राप्त केली. त्यानंतर तेजसला अनेक राष्ट्रीय कंपनीतून नोकरीच्या ऑफर मिळाल्या. मात्र तेजसने त्यास नकार दिला. कारण तेजसने लहानपणीच आपण मोठे अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत काम करावे, असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न तेजसला स्वस्थ बसू देत नव्हते.
त्यानंतर तेजसने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरवात केली. तेजसने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु यशाचा रस्ता थोडासा खडतर होता. अंतिम यश हे थोड्या थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. मात्र तेजस हा अपयशाने खचला नाही. जिद्द मेहनत, संयम, चिकाटीच्या जोरावर पुन्हा जोरदार अभ्यास केला. जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी २ ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
दरम्यान, शेतकऱ्याच्या पुत्र तेजस शितोळे याने जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंताच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना तेजस शितोळे यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तेजसच्या यशाबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणीक, शासकीय क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील, बहिण व मित्रपरिवार आहेत. या सर्वांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करतो. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर गाठून नक्की अधिकारी बनू शकता.
तेजस शितोळे ( जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंताची परीक्षा उत्तीर्ण)