बापू मुळीक
सासवड: पुरंदर तालुक्यातील सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि आरपीआय यांच्यावतीने पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सासवड येथे दर वर्षी सिद्धार्थ सामाजिक प्रतिष्ठान आणि आरपीआय यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव आयोजित केला जातो. यावर्षी 19 एप्रिल रोजी सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्याख्यान, मान्यवरांना पुरस्कार आणि शाहीर जलसा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे उद्घाटन आरपीआयचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे त्याचबरोबर पुरंदरचे आमदार विजय शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्रोही साहित्य चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोपळे यांचे हिंदुत्व आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदुत्व संदर्भातील काय विचार होते? याबद्दलचे विचार त्यांनी मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनामध्ये हिंदूंचा कधीच विरोध केला नाही. मात्र काही प्रवृत्तींचा त्यांनी निश्चित विरोध केला असे म्हटले.
यानंतर विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्या मान्यवरांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये चांगले काम करणारे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रशासकीय सेवेबद्दल ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्रशासकीय सेवा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर नितीन माने यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श वैद्यकीय सेवा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई डंबाळे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकार राहुल शिंदे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सासवड येथील हॉटेल व्यवसायीक विनोद जगताप यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श उद्योजक सेवा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे आणि पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आरबीआयचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे आणि माजी आमदार अशोकराव टेकवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सूर्यकांत वाघमारे येणारी आरपीआय पुरंदर तालुक्यामध्ये पहिल्यापासूनच भक्कम आहे. पंकज धिवार यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयने चांगली प्रगती केलेली आहे. पंकज धिवार हे निवडणुकीच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण वेळपर्यंत तेच अध्यक्ष असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही लोकशाहीला मानतो. जनमताला मानतो म्हणूनच आम्ही निवडणुकीला देखील मानतो.
यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, मार्तंड देव संस्थांचे ट्रस्टी मंगेश घोणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, आरपीआयचे उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, मावळचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, मावळ तालुका युवा अध्यक्ष अंकुश सोनवणे, अजय धीवर, रवि वाघमारे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुप्रिया वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांच्या ‘गाण्याचा नजराना’ शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं
प्रास्तविक पंकज धिवार यांनी केले. सूत्र संचलन दत्ता रोकडे यांनी केले तर आभार युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी मानले.