युनूस तांबोळी
शिरूर : मंडळी बैल जोडा झटकन …घाटातून जाऊ द्या पटकन…भीर्र र्र…झाली!!! अशा वातावरणात वाघाळे ( ता. शिरूर ) येथे कालिकामाता देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या बैलगाडा घाटात जवळपास ४५० बैलगाडे धावणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या शर्यतींचे थेट प्रक्षेपण केलेले असल्याने मोबाईलवर घर बसल्या आनंद घेतला जात होता. त्यामुळे कडक उन्हातही घरात बसून नागरिकांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला.
गेल्या सात वर्षात बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती. त्यातून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यास राजकीय, सामाजिक तसेच बैलगाडा मालकांना यश आले. त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या कुलदैवतांच्या यात्रेत बैलगाडा घाट सजवला गेला आहे. ग्राम दैवतेचे पूजन करून विविध कार्यक्रमांनी भाविकांना सुखसुविधा देत दर्शनाची संधी मिळवून दिली जात आहे. कोरोना काळात बंद असणारे मंदीर आता भाविकांसाठी खुली झाल्याने प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
सर्वसाधारण वर्षेभर शेतीत काम करत असताना फक्त उन्हाळ्याचे चार महिने मनोरंजनात घालविण्यासाठी कुलदैवतांच्या यात्रा जत्रा भरविल्या जात होत्या. कौटुंबिक दैनंदिन वस्तूसाठी कुठलीही बाजारपेठ नसल्याने फक्त यात्रांमध्ये अशा वस्तू मिळत असत. त्यामुळे महिलावर्गाचा खरेदीसाठी मोठा उत्साह असायचा. मनोरंजनासाठी फक्त या काळातच नाटक, लोकनाट्य तमाशा किंवा चित्रपट पहावयास मिळत असे. त्यातून लोककलेचा आनंद ग्रामीण भागातील नागरिक घेताना दिसत होते. या यात्रांमधून हौशी, गवशी व नवसी असे यात्रेकरू पहावयास मिळत होते. मात्र काळ बदलला आता त्यामुळे यात्रेच्या स्वरूपात बदल होत गेला.
मनोरंनासाठी बैलगाडा शर्यत आता मोठे विशाल स्वरूप धारण करू पहात आहे. एक दिवशी फक्त काही तास ही बैलगाडा शर्यत भरली जात होती. आता दोन दिवस बैलगाडा शर्यती भरविल्या जात आहे. बक्षीसांची संख्या व स्वरूप बदलले आहे. कडक उन्हात बैलगाडा घाटात थांबून ही शर्यत पहाण्यापेक्षा आता ही शर्यत घरबसल्या पाहिली जात आहे. यात्रा कमेटीच्या माध्यमातून थेट मोबाईल वरील अॅप च्या माध्यमातून ही बैलगाडा शर्यंत पाहिली जात आहे. त्यामुळे घरातील जेष्ट पुरूष, महिला तसेच मुलांनाही हा आनंद घेता येऊ लागला आहे.
बैलगाडा घाट आणि बैलगाडा शौकीन यामुळे या परिसरात लहान मोठे व्यवसायिक वाढले आहे. प्रत्येक ठिकाणी बाजारपेठेचे स्वरूप मॅाल मध्ये झाले असल्याने आता यात्रेत खरेदी करण्यापेक्षा रोजची बाजारपेठ जवळची झाली आहे. त्याचा परिणाम लहान लहान व्यावसायिकांवर झाला असून हे लहान व्यवसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहे.
बैलगाडा शर्यती ह्या सर्वसामान्यांचे परंपरा जतन करण्याचे व मनोरंजनाचे साधन आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात लहान लहान व्यवसायिकांची उपजीवीका चालते. सध्या मोबाईल वर देखील थेट प्रक्षेपण होऊ लागल्याने घरातील कुटूंबांना एकत्रात बसून या यात्राचा व आनंद घेता येऊलागला आहे. कडक उन्हातल्या या शर्यतीमुळे घरात बसून मिळणारी ही सुवीधा महत्वाची मानली जात आहे.
मानसिंग पाचुंदकर (अध्यक्ष -राष्ट्रवादी कॅाग्रेस आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघ)
तंत्रयुगात शेतकरी हा शेती तांत्रिक पद्धतीने करत असला तरी देखील शेती व त्यातील बैलजोडी हा कुटूंबाचा एक भाग आहे. त्यामधून बैलगाडा घाटातील शर्यती हा शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा विषय आहे. त्यामुळे गावागावातील प्रत्येक घाटात बैलगाडा शौकिनांची गर्दी होत असते. या शर्यतीचे थेट प्रक्षेपण मोबाईलवर होऊ लागल्याने महिलांना देखील त्याचा मोबाईलवरआनंद घेता येऊ लागला आहे. स्वाती पाचुंदकर, अध्यक्षा, श्री क्षेत्र महागणपती देवस्थान, रांजणगाव गणपती