जीवन सोणावने
नसरापूर (भोर) : वर्षानुवर्षे सुरू असलेली शिक्षण पद्धत अलीकडच्या काळात बदलत आहे. बदलती शिक्षण पद्धत विचारात घेऊन शिकवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना काय हवे आहे, ते कसे शिकवले पाहिजे हे शिक्षकाने ओळखून नवीन शिक्षण पद्धत आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन जेएसपीएम विद्यापीठ पुणे चे कुलगुरू डॉ. भरतकुमार अहुजा यांनी केले.
नसरापूर येथील नवसह्याद्री अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालय यांच्या वतीने महाविद्यालयामध्ये येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान सात दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा मंगळवार दिनांक १९ रोजी उद्घाटन सोहळा पार पडला या प्रसंगी डॉ. अहूजा बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके, समूह संचालक सागर सुके, उपाध्यक्षा सायली सुके, प्राचार्य डॉ मनोजकुमार दळवी, एमबीए चे संचालक डॉ. तानाजी दबडे, प्राचार्य डॉ किशोर ओतारी, प्राचार्य पंकज भोकरे, प्राचार्य किरण पवार, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.
डॉ. अहुजा पुढे म्हणाले, सध्याच्या विद्यार्थ्यांचे अध्ययनात लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक नवीन तंत्रेंचे वापर करावे लागतील. जास्तीत जास्त वेळ विद्यार्थी अध्ययन कसे करू शकतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पोपटराव सुके म्हणले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी वेळेचे बंधन न पाळता काम करून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत. विविध प्रकल्प, नाविन्यपूर्ण कल्पना यासाठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करावे.
कार्यशाळेसाठी देशभरातून जवळपास ५४५ पेक्षा अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोजकुमार दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. अमर कल्याणी व प्रा. स्नेहल जिरंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिक्षा जाधव व प्रा. प्रतिक मुळे यांनी केले.