संतोष पवार
पळसदेव : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेत्तरांच्या भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हिशोब हे शालार्थ वेतन प्रणालीतून मिळणार असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
खाजगी अनुदानित, प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-याचे वेतन शालार्थ प्रणाली मधुन देण्यात येते .मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येक महिन्यातून कपात होणारी फंडाची (पी. एफ.) रक्कम ही शालार्थ प्रणाली मधून मिळत नसल्याने शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचा-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीच्या मिळणाऱ्या पावत्या, अद्ययावत ऑनलाइन लेखा, बदली कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेखा वर्ग करणे, निर्वाह निधी अग्रीम परतावा रक्कम आदि बाबींवर महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून शालार्थ प्रणाली मधूनच भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मिळावा अशी मागणी शासनाकडे केली.
शासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत शालार्थ वेतन प्रणाली मधून भविष्यनिर्वाह निधीचा हिशोब देण्याबाबचतचे पत्र काढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात किती रक्कम जमा आहे, याचा हिशोब तात्काळ मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीची आग्रिम परताव्याची रक्कम ऑनलाइन पद्धतीने मिळणे सोपे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली.