नीरा (पुणे) : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथे अल्पवयीन मुलीवर एका शिक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या विरोधात शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नीरा येथे वाॅर्ड नंबर एकमध्ये ज्ञानदीप कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या सुनील चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही त्याच्या खासगी शिकवणीत शिकण्यासाठी जात होती. त्याने पहिल्यांदा पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. १ मे २०२३ रोजी दुपारी १ वाजल्यानंतर ज्ञानदीप कोचिंग क्लासच्या आतील खोलीमध्ये घेऊन जात आरोपीन शिक्षकाने तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आपण लग्न करू असे म्हणून जवळ ओढून घेऊन विनयभंग केला.
त्यानंतरही त्याने असे कृत्य तिच्यासोबत वारंवार केले. काही दिवसांनी पुन्हा त्याने क्लास संपल्यावर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आरोपी चव्हाणने तिला कोचिंग क्लासेसच्या मुली बाहेर गेल्यानंतर तिला थांबवून घेतल. दुसऱ्या रूममध्ये घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केला. त्यावेळी पीडित मुलीनं असं करू नका म्हणून विरोध केला.
मात्र त्याने तिचे न ऐकता तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तुला नापास करेन अशी धमकी देऊन अत्याचार केला. १५ जानेवारीला रात्री याबाबतची जेजुरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याबाबतचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहेत.