पुणे : शालेय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार आहे. ५ फेब्रुवारीला दुपारनंतर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना वीस हजारांहून अधिक जागांच्या जाहिराती पाहण्यास मिळणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यामुळे झाला विलंब
शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, मराठी-इंग्रजी माध्यम वाद, केंद्र शाळेवर साधनव्यक्ती नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रियेस खूप विलंब झाला होता. अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार खासगी शिक्षण संस्थांमधील २० हजारांहून अधिक जागांसाठीच्या जाहिराती सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
तब्बल १६ हजार ५०० जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती
जिल्हा परिषदेच्या ७० टक्के जागांची भरती प्रक्रिया सध्या राबविली जात असून रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे आठशे जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही, तर खासगी शिक्षण संस्थेच्या जागावरसुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तब्बल १६ हजार ५०० जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती केल्या जाणार आहेत. उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त केल्या जातील.