पुणे : शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुभम विश्राम नाईक (वय- २७, रा. स्वारगेट) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. नराधम शिक्षकावर शाळेने कारवाई करत शाळेतून काढून टाकले आहे. त्याशिवाय, माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम नाईक हा पिडीत विद्यार्थीनीच्या शाळेत स्पोर्ट शिक्षक म्हणून कामाला होता. पिडीत विद्यार्थिनीला सोशल मीडियावर अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवून शिक्षकानेच विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी मुलीसोबत तिच्या वर्गातील इतर काही मुलींना त्याने इंस्टाग्रामवर कॉन्टेक्ट केला. त्यानंतर संवाद वाढवत शुभम नाईक याने अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवले होते. हा प्रकार शाळेतील इतर शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीला तक्रार देण्याचा सल्ला दिला.
याप्रकरणी शनिवारी अल्पवयीन मुलीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार शुभम नाईक याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १७ जानेवारी २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.