पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेश दिल्यानंतरही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी न झाल्याने त्याच्या निषेधार्थ राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी येत्या १ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बगळे आणि महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी विविध मागण्यांसाठी यापूर्वी ३ मार्चला बेमुदत कामबंद संप पुकारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करत स्वाक्षरी करून राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४,८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. मात्र, राज्याचे अपर मुख्य सचिव यांनी अद्याप अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महसूल विभागातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावर अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकून त्यांना वेगवेगळी कामे सांगितली जातात. त्यानुसार ती कामे केलीही जातात. परंतु, पगार वाढीच्या बाबतीत मात्र दिरंगाई केली जाते. त्यामुळेच शेवटी नाईलाजाने आम्ही काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान या आंदोलनात सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही संघटनेकडून करण्यात आले आहे.
दाखले मिळण्यात अडचणी
तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्याचबरोबर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला देखील मोठा फटका बसणार आहे. आंदोलनामुळे नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी ताटकळत राहावे लागण्याची शक्यता आहे.