पुणे : मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून टँकर मंजुरीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. आता टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सद्य स्थितीला जिल्ह्यातील दहा तालुक्यांत तब्बल २२९ टँकर सुरू आहेत. मे अखेरपर्यंत आणखी टँकर वाढण्याची शक्यता असून, टँकरची मागणी झाल्यानंतर त्याची पडताळणी करून तातडीने टैंकर सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टँकर सुरू झाले होते. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्यानंतर कमी पावसामुळे टँकर सुरूच राहिले होते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात चालू झालेले पाण्याचे टँकर अद्यापही सुरूच आहेत. पाणीटंचाईमुळे यंदा टँकरची संख्या वाढली आहे. त्यामुळे टँकर मंजुरीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, ते अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावांत, वाड्या-वस्त्यांमध्ये पाण्याचे टँकर आवश्यक असल्यास प्रांत कार्यालयात मागणी केल्यानंतर टँकर सुरू केले जात आहेत, अशी माहिती रोहयोच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी यांनी दिली.