-संतोष पवार
पळसदेव : इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी तानाजी सुर्यवंशी तर व्हा.चेअरमनपदी धनंजय पोंदकुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.कदम यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यांच्या बैठकीचे शुक्रवार ( ता.4) रोजी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चेअरमन पदासाठी तानाजी जगन्नाथ सुर्यवंशी यांची निवड व्हावी, अशा प्रकारची सूचना संस्थेचे संचालक तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी मांडली. त्यास उपस्थित सदस्यांनी मान्यता दिली. तद्नंतर व्हा.चेअरमन पदासाठी धनंजय हरिदास पोंदकुले यांची निवड व्हावी अशा प्रकारची सूचना संस्थेचे संचालक संतोष हगारे यांनी मांडली, त्यास उपस्थित सदस्यांनी मान्यता दिल्यानंतर चेअरमनपदी तानाजी जगन्नाथ सुर्यवंशी यांची व्हा. चेअरमनपदी धनंजय हरिदास पोंदकुले बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. कदम यांनी जाहीर केले.
बैठकीत 13 सदस्या पैकी 2 सदस्य गैरहजर होते. निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन सुर्यवंशी व नूतन व्हा. चेअरमन पोंदकुले यांनी सांगितले की, सर्व सदस्यांना व सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेचा नावलौकिक वाढण्यासाठी व कर्ज वसुली करून संस्थेच्या सभासदांना लाभांश देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्यानंतर उपस्थित संचालकाच्या वतीने नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव सिंकदर आत्तार व सहसचिव शरद वाघ यांनी सहकार्य केले.