पुणे : ताम्हिणी घाट हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात अनेक लोक निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवण्यासाठी ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट देतात. परंतु रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटातील रस्ता खचला आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी 2 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून 5 ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे निर्देश पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहे.
रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या ताम्हिणी घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक ये-जा करतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील आधारवाडी आणि डोंगरवाडी गाव येथील भागात खटलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी 2 ऑगस्ट ते 5 ऑगस्टपासून सकाळी 8 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातून पुण्याला जाणारा वरंधघाट आधीच बंद आहे. त्यामुळे पोलादपूर महाड माणगाव तसेच रोहा आणि श्रीवर्धन विभागातील नागरिकांना पुणे येथे जाण्यासाठी एकमेव असलेला ताम्हणी घाट 2 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत म्हणजे तब्बल दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने या परिसरातील नागरिकांनी कोणत्या रस्त्याने जायचे, असा प्रश्न राज्य शासनाला केला आहे.