इंदापूर / दीपक खिलारे : तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी विकासाच्या पोकळ गप्पा न मारता त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये किती मुस्लिम युवकांना रोजगार दिला, या मी विचारलेल्या साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे प्रत्युत्तर राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना दिले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्याच्या आजपर्यंतच्या वैभवशाली परंपरेत सर्वधर्मसमभावाची आणि विकासाची गंगा सर्व कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे आपण कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य केले. विरोधक केवळ भाषण आणि भावनिक साद घालण्यात तरबेज आहेत. परंतु, त्यांच्या भावनिक सादेला तालुक्यातील जनता आता भूलणार नसल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले, तालुक्यामध्ये आताच्या लोकप्रतिनीधींकडून एकही नवीन शैक्षणिक संस्था किंवा तुकडी किंवा उद्योग व्यवसायाची उभारणी झाली नाही. विकासासाठी भरीव योजना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी एकही प्रयत्न यशस्वी ठरला नाही. उलट जनतेचे प्रश्न आणि समस्या वाढवण्यात त्यांनी मोठी कामगिरी केल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी केवळ विकासाच्या पोकळ गप्पा मारताहेत
हर्षवर्धन पाटील म्हणाले, तालुक्याचे लोकप्रतिनिधी केवळ विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. त्यांचा विकास जनतेपर्यंत पोहोचला नाही. असे असतानाही ते जनतेला भावनिक होऊन विकासाचे नव-नवीन स्वप्न दाखवत आहेत. त्यांनी मी विचारलेल्या साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. अन्यथा तालुक्यातील जनता त्यांना येणाऱ्या काळात योग्य प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.